महाराष्ट्र नगरी न्यूज नेटवर्क
अकलुज (सोलापूर): गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा १० टक्के इतका आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस, आय बी प्रो डेस्क कंपनी, आणि MASTERSYNERGY EDUTECH LLP या कंपन्यांच्या माध्यमातून सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे:
१) नवनाथ जगन्नाथ अवताडे (रा. फळवणी, ता. माळशिरस, सध्या रा. बिबवेवाडी, पुणे)
२) शुभम नवनाथ अवताडे (रा. फळवणी, ता. माळशिरस, सध्या रा. बिबवेवाडी, पुणे)
३) सुवर्णा नवनाथ अवताडे (रा. फळवणी, ता. माळशिरस, सध्या रा. बिबवेवाडी, पुणे)
४) अशोक आगतराव पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस)
५) उमा अशोक पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस)
६) आदेश अशोक पवार (रा. उघडेवाडी, ता. माळशिरस)
अकलुज येथील एका महिला फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी स्थापन केलेल्या तिन्ही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्यास दरमहा १० टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन दिले. फिर्यादी महिलेकडून २४ लाख ५० हजार रुपये तसेच इतर १४ गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम घेण्यात आली. मात्र कोणताही परतावा न देता किंवा मूळ गुंतवणूक रक्कम परत न करता त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अकलुज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ८१५/२०२५, बीएनएस ३१८ (४), ३५१(२), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की,आरोपींनी सोलापूर, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची रक्कम स्वीकारलेली आहे. त्यामुळे या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी असून, आरोपी आणि फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या नागरिकांनी इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस,आय बी प्रो डेस्क कंपनी किंवा MASTERSYNERGY EDUTECH LLP या किंवा अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक झाली आहे,त्यांनी तात्काळ त्यांचे गुंतवणुकीचे कागदपत्रे घेऊन अकलुज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस अधीक्षक.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक.प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोहेकॉ अमोल बकाल आणि समीर पठाण हे करीत आहेत.

