Breaking

गुरुवार, ३ सप्टेंबर, २०२६

गांधी DP ची क्षमता वाढवण्यासाठी विजयसिंहनगरवासीयांचे महावितरणला निवेदन; १०० KVA क्षमतेची डीपी तत्काळ बसवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन


​अकलूज (प्रतिनिधी):विजयसिंहनगर (माळीनगर) येथील वाढत्या लोकसंख्येमुळे आणि विजेच्या अतिरिक्त भारामुळे त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी गांधी DP ची क्षमता ६३ KVA वरून १०० KVA करण्याची आग्रही मागणी केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना लेखी निवेदन सादर केले.

गांधी DP वर सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ६३ KVA ची क्षमता कमी पडत असल्याने डीपीवर सतत ओव्हरलोड (अतिभार) येत आहे. यामुळे डीपी ट्रिप होणे, फ्युज उडणे आणि डीपी जळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. विज खंडित होत असल्याने परिसरातील नागरिकांचे फ्रीज, टीव्ही, मोटर यांसारखे महागडे विद्युत उपकरण जळून नुकसान होत आहे.

​विशेषत  या परिसरात दोन रुग्णालये आहेत. विजेच्या लपंडावामुळे रुग्णालयातील अत्यावश्यक वैद्यकीय सेवा प्रभावित झाल्या असून काही रुग्णांना इतर दवाखान्यात हलवण्याची वेळ आल्याचे निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे हा विषय केवळ गैरसोयीचा नसून नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेशी संबंधित अत्यंत गंभीर बाब बनली आहे.​


या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ६३ KVA ऐवजी १०० KVA क्षमतेचा नवीन डीपी मंजूर करून तो तातडीने बसवण्यात यावा, अशी  विनंती विजयसिंहनगर परिसरातील नागरिकांनी केली.

​नागरिकांची अडचण आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी १०० KVA ची नवीन डीपी तत्काळ बसवून देण्याची मागणी मान्य केली आहे. लवकरात लवकर नवीन डीपी कार्यान्वित करून परिसरातील वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. महावितरणच्या या सकारात्मक निर्णयामुळे विजयसिंहनगर भागातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.