बारामती:बहुजन समाज पार्टीच्या बारामती नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका संघमित्रा काळूराम चौधरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बहुजन समाज पार्टीच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी काळूराम चौधरी यांच्या गेल्या ३० वर्षांच्या बहुजन समाज पार्टीतील राजकीय संघर्षाचा विशेष उल्लेख केला. पवारांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत बहुजन समाज पार्टीची हत्ती चिन्हासह सन्मानपूर्वक झालेली एन्ट्री ही केवळ निवडणूक विजय नसून, बहुजन चळवळीचा आत्मविश्वास वाढवणारा ऐतिहासिक क्षण असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या यशामुळे बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने आगामी माळशिरस तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका यामध्ये पक्षाने कशाप्रकारे नियोजन करावे,संघटनात्मक बांधणी कशी मजबूत करावी तसेच तळागाळातील मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका प्रभावीपणे कशी पोहोचवावी,यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टी स्वतंत्रपणे आणि ताकदीने उभी राहत जनतेचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून लढा उभारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सुरज सरतापे (माजी तालुकाध्यक्ष), अभिजीत वजाळे (ग्रामपंचायत सदस्य), आकाश कांबळे, संतोष कांबळे, राजरत्न जगताप, तुषार काटे व माळीनगर येथील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

