Breaking

सोमवार, २९ डिसेंबर, २०२५

भाळवणीत अवजड वाहतुकीचा हैदोस; ग्रामस्थांचा 'बेमुदत रस्ता रोको'चा इशारा


प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात


भाळवणी (प्रतिनिधी): पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या भाळवणी गावातून होणारी ऊस वाहतूक आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या मंगळवारी दि.३०/१२/२०२५ पासून मारुती मंदिराजवळ बेमुदत रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी  निवेदनातून दिला आहे.

भाळवणी गावातील मुख्य रस्ते सध्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली आणि अवजड डंपरच्या विळख्यात अडकले आहेत. बसस्थानक, दर्गा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भीमनगर, गोंधळे गल्ली आणि लोखंडे चौक या दाट लोकवस्तीच्या भागातून रात्रंदिवस ही वाहने धावत आहेत.शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे  अरुंद रस्त्यांवर अवजड वाहने अडकल्याने तासन् तास वाहतूक ठप्प होत आहे​ रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उडणाऱ्या धुळीने नागरिकांचे श्वसनाचे विकार वाढले आहेत.

विशेष म्हणजे  बसस्थानक ते गोंधळी गल्ली दरम्यानचे अतिक्रमण हटवणे आणि अवजड वाहतूक बंद करणे याबाबतचा ठराव ग्रामसभेत रीतसर मंजूर करण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही,लोकशाही मार्गाने घेतलेला निर्णय प्रशासन का धाब्यावर बसवत आहे? एखादा बळी गेल्यावरच यंत्रणेला जाग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

गावातील अंतर्गत रस्त्यांवरून होणारी अवजड वाहतूक तात्काळ बंद करावी. ही वाहतूक पर्यायी बायपास मार्गाने वळवण्यात यावी, रस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवून रस्ते मोकळे करावेत,​वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला, पण आश्वासनापलीकडे काहीही मिळालेले नाही. आता आमच्याकडे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत रस्ता रोको मागे घेतला जाणार नाही. असा इशाराच  ग्रामस्थांनी दिला आहे.​या आंदोलनात गावातील व्यापारी, शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.