माळशिरस / वेळापूर: सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत आणि अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यवसायांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. नवे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कारभार हाती घेताच प्रशासनाने अवैध धंद्यांविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या धडक कारवाईच्या सत्राला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आज, शनिवार दिनांक ३० मे २०२६ रोजी माळशिरस तालुक्यातील पिसेवाडी (वेळापूर) येथील एका मोठ्या दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली.मे जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शितकरण केंद्र असे कारवाई करण्यात आलेल्या डेअरीचे नाव असून या डेअरीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पंढरपूर-पुणे रोडवरील ईकोबोर्ड कंपनीच्या समोर, मु. पिसेवाडी (पो. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे 'मे. जय हनुमान भाईनाथ दूध संकलन व शितकरण केंद्र' कार्यरत आहे. या डेअरीचे मालक गणेश काळे पाटील यांना अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना घेण्याबाबत विभागातर्फे वारंवार कायदेशीर सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून काळे पाटील यांनी कोणत्याही वैध परवान्याशिवाय अनधिकृतरीत्या आपला दूध व्यवसाय सुरूच ठेवला होता. आज अन्न व औषध प्रशासन सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी या डेअरीला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. या तपासणी दरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या. या डेअरीमध्ये अन्न सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत सुरक्षित आणि स्वच्छ अन्न (दूध) पुरविण्याबाबतच्या बहुतांश महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा हा प्रकार समोर आल्यानंतर, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तातडीने ॲक्शन मोडमध्ये येत या डेअरीचा व्यवसाय तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे कडक निर्देश दिले.
या धडक कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनिल जिंतूरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांना कडक इशारा व आवाहन केले आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना घेऊनच आपला व्यवसाय करावा. जनतेला सुरक्षित, स्वच्छ आणि निर्भेळ अन्नपदार्थांचा पुरवठा व्हावा यासाठी अन्न सुरक्षा कायदा २००६' मधील सर्व नियमांचे व तरतुदींचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई केली जाईल.सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा हक्क आहे.जर कोणाला अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत,भेसळीबाबत किंवा अनधिकृत व्यवसायाबाबत शंका किंवा तक्रार असेल, तर त्यांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा.
तक्रारीसाठी संपर्क माध्यम:
मोबाईल क्रमांक: ९४०५५९६३४०
ई-मेल आयडी: fdasolapur@gmail.com
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या धडक कार्यपद्धतीची प्रचिती देणाऱ्या या पहिल्याच मोठ्या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील दूध व्यावसायिक आणि अन्न खाद्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या या कडक भूमिकेचे सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.



