अकलुज (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सोलापूर कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी माळशिरस तालुक्यातील अकलुज येथील एका प्रतिष्ठित पेढीवर छापा टाकून तब्बल २ लाख ४४ हजार ७०० रुपये किमतीचा ९९७ किलो पामोलिन तेलाचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेताच सोलापूर जिल्ह्यात ही धडक कारवाई झाल्याने अन्न व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अकलुज येथील मे. जयकुमार दुलचंद दोशी या पेढीची अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी अचानक तपासणी केली. या तपासणी दरम्यान पेढीतील पामोलिन तेलाचा साठा हा कमी दर्जाचा किंवा त्यावर लेबलदोष असल्याचा संशय आल्याने, डॉ. लवटे यांनी तातडीने तेलाचा कायदेशीर नमुना ताब्यात घेतला. उर्वरित ९९७ किलो ग्रॅम वजनाचा आणि २,४४,७००/- रुपये किमतीचा तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत तो संबंधित विक्रेत्याच्याच ताब्यात सुरक्षित आणि सील करून ठेवण्यात आला आहे. या तेलाचा प्रयोगशाळेतील अहवाल आल्यानंतर पुढील कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त म्हणून डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या शिस्तबद्ध आणि कडक कार्यपद्धतीचा प्रभाव आता ग्राऊंड लेव्हलवर दिसू लागला असून, सोलापूर जिल्ह्यात झालेली ही कारवाई त्याचाच एक भाग मानली जात आहे.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विभागाचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई, सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर व अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे यांनी जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांना कडक इशारा दिला आहे. सर्व लहान-मोठ्या अन्न व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासनाचा अधिकृत परवाना किंवा नोंदणी करूनच आपला व्यवसाय करावा. तसेच ग्राहकांना सुरक्षित आणि निर्भेळ अन्नपदार्थांचा पुरवठा होईल, यादृष्टीने 'अन्न सुरक्षा कायदा २००६' मधील सर्व नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


