इच्छा असेल तर मार्ग दिसतो आणि कष्टाला पर्याय नसतो याचाच प्रत्यय पुन्हा एकदा अकलूजमध्ये आला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पंचवटी येथील कु. गायत्री रत्नकांत क्षीरसागर हिने मुंबई पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिची मुंबई शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण अकलूज आणि पंचवटी परिसरात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गायत्रीच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून गायत्रीचे विशेष अभिनंदन केले आणि तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सचिन देशमुख, नगरसेविका प्रियंका गायकवाड आणि पंचवटी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी गायत्रीच्या कष्टाचे आणि तिच्या पालकांच्या त्यागाचे जाहीर कौतुक केले.वडील रत्नकांत क्षीरसागर हे अकलूज येथील जुन्या पोलीस स्टेशनसमोर पुरी-भाजीचा गाडा चालवून कुटुंबाचा गाडा हाकतात, तर आई उमादेवी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शेतमुजुरीचे काम करतात. एका छोट्याशा पत्र्याच्या घरात राहून, आई-वडिलांनी दिवस-रात्र खाल्लेल्या खस्तांचे आज गायत्रीने पोलीस वर्दी मिळवून चीज केले आहे.
मैदानी सराव करणे आणि जिद्दीने लेखी परीक्षेचा अभ्यास करत तिने हे नेत्रदीपक यश खेचून आणले.गायत्री मुंबई पोलीस दलात रुजू होणार हे समजताच पंचवटी परिसराचे डोळे कौतुकाने ओलावले. फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व पंचवटी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष शरीफभाई पठाण यांनी क्षीरसागर कुटुंबाची भेट घेऊन गायत्रीचा यथोचित सन्मान केला. गायत्रीचे हे यश ग्रामीण भागातील मुलींसाठी अत्यंत प्रेरणादायी असून प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करावी, याचे उत्तम उदाहरण तिने घालून दिले आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने थेट देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या पोलीस दलात मिळवलेले हे स्थान संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
'महाराष्ट्र नगरी न्यूज' कडून कु. गायत्री क्षीरसागर आणि क्षीरसागर कुटुंबाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!




