Breaking

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

माळीनगरमध्ये 'रंजनभाऊ' गिरमेंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


१७५ जणांचे रक्तदान अन् विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


माळीनगर (प्रतिनिधी) येथील 'दि सासवड माळी शुगर फॅक्टरी'चे चेअरमन आणि माळीनगर फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक राजेंद्र उर्फ रंजनभाऊ गिरमे यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिबिरात १७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


​सालाबादप्रमाणे याही वर्षी ५ डिसेंबर रोजी माळीनगर गेस्ट हाऊस येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण १७५ जणांनी रक्तदान केल्याची माहिती डॉ. भूषण म्हेत्रे यांनी दिली.


या रक्तदान शिबिराचे अध्यक्षस्थान कारखान्याचे नूतन मॅनेजिंग डायरेक्टर गणेश इनामके यांनी भूषविले, तर शिबिराचे उद्घाटन महात्मा फुले पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन महादेवराव एकतपुरे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या सामाजिक उपक्रमांतर्गत सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने वह्यांचे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी माळीनगर साखर कारखान्याचे संचालक विशाल जाधव, नूतन इंडिपेंडेंट डायरेक्टर मुरलीधर राऊत, शुगरकेन सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे, व्हा. चेअरमन कपिल भोंगळे, संचालक जयवंत चौरे, एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे, संचालक पृथ्वीराज भोंगळे, दिलीप इनामके, गहिनीनाथ बँकेचे चेअरमन शिरीष फडे, मॉडेल हायस्कूलचे उपप्राचार्य रितेश पांढरे, डॉ. रवींद्र शिंदे, रिंकू राऊत, लक्ष्मण डोईफोडे, मच्छिंद्र हजारे, अनिल बनकर, योगेश कचरे, प्रदीप घाडगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, सासवड माळी एज्युकेशन सोसायटी, माळीनगर विकास मंडळ, महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टीस्टेट आणि व्यापारी मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन संजय बांदल, राजेश कांबळे व बाळासाहेब सोनवणे यांनी केले. ​६ डिसेंबर रोजी चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या 'गोकुळ' या निवासस्थानी सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव झाला. माळीनगर पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, भागधारक, राजकीय, सहकार, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, तसेच डॉक्टर, वकील, पत्रकार आणि कारखान्याचे अधिकारी-कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी गिरमे यांनी सर्वांच्या सत्काराचा स्वीकार करत आभार मानले