अतिवृष्टीची भरपाई द्या, अन्यथा सोलापुरात 'नो एन्ट्री'; युवा सेनेचा कृषीमंत्र्यांना १५ दिवसांचा अल्टीमेटम!
सोलापूर:अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ दिवसांच्या आत भरपाई न मिळाल्यास, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) यांना सोलापूर जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही, असा खणखणीत इशारा युवा सेनेने दिला आहे. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर माळीनगर येथे युवा सेनेच्या वतीने 'रस्ता रोको' आंदोलन करत हा आक्रमक पवित्रा घेण्यात आला.
युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले की, दिवाळीत सरकारने मोजक्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करून केवळ रडक्यांचे डोळे पुसण्याचे काम केले आताही सरकार थोड्या-थोड्या शेतकऱ्यांना पैसे देऊन वेळ मारून नेत आहे शेतकऱ्यांची चेष्टा न करता, सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पैसे तुकड्यांत न देता ते एकवट जमा करावेत,अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
जर पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, तर कृषीमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा यावेळी इंगळे यांनी दिला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र युवा सेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आता काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

