इंदापूर : प्रतिनिधी... महादेव मोहिते
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने रौप्यमहोत्सवी चालू सन २०२५-२६ च्या ऊस गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन ₹3101 प्रमाणे उच्चांकी उचल देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही ऊस बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी (दि. 5) जमा केली जाईल, अशी माहिती कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी गुरुवारी (दि. 4) दिली.
कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन ₹3101 प्रमाणे उचल जाहीर केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. यासोबतच, नीरा भीमा कारखान्याने चालू गळीत हंगामात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. कारखान्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.चालू 25 व्या ऊस गळीत हंगामात सुमारे 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने कारखान्याची वाटचाल सुरु आहे.
गाळप (दि. 3 अखेर): 2 लाख मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण.साखर उत्पादन (दि. 3 अखेर): 145300 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन.आजचा साखर उतारा 10.70% असून, सरासरी साखर उतारा 10.00% एवढा आहे.कारखान्याची प्रतिदिनी गाळप क्षमता 3500 मे. टन असून सध्या सरासरी 5700 ते 5900 मे. टन क्षमतेने ऊस गाळप सुरु आहे.आर्थिक अडचण असूनही शेतकऱ्यांचे हित स्थितीत कारखान्याला काही प्रमाणात आर्थिक अडचण असतानाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी ₹3101 प्रमाणे उचल देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, असे सौ. पाटील यांनी स्पष्ट केले.
आज अखेर 7230041 युनिट वीज एक्स्पोर्ट करण्यात आली आहे.आज अखेर 1690100 लिटर उत्पादन झाले आहे बायोगॅस आणि सेंद्रिय खत आदी उपपदार्थ निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत.आवाहन शेतकी विभागाच्या ऊस तोडणी कार्यक्रमानुसार गळीत हंगाम जोरात सुरू आहे. शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, ज्यामुळे चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असे आवाहन भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
विना कपात ₹3101 प्रमाणे रक्कम शुक्रवारी जमा होणार नीरा भीमा कारखान्यास चालू ऊस हंगामामध्ये दि. 15 नोव्हेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांची कोणतीही कपात न करता ₹3101 प्रमाणे होणारी ऊस बिलाची सर्व रक्कम शुक्रवार (दि. 5) रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असे अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी विशेषत्वाने सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, आणि कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.

