Breaking

गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

काळेपडळ पोलिसांची '३३०० किमी'ची यशस्वी मोहीम: दोन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुटका, दोन आरोपी जेरबंद

दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.रजि.क्र. ४९०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल. भा.न.स. (BNS) कलम ६४, ६५ (१), ६९, ७१, ९६. १३७ (२), ३ (५), तसेच POCSO कायदा कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंद. ​पुणे शहरातील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच वेळी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पुणे पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही दिवसांतच या मुलींना राजस्थानमधून सुखरूप सोडवून दोन आरोपींना अटक केली आहे.

गुन्हा दाखल होताच, तपास पथकाने तातडीने संशयित आरोपींच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण  सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, काळेपडळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे, पो.अं. शाहीद शेख, महादेव शिंदे, तसेच गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस अंमलदार शशिकांत नाळे आणि गणेश माने यांचे विशेष पथक तातडीने रवाना झाले. ​या पथकाने गुजरात आणि राजस्थानमधील अनेक शहरांत तब्बल ३३०० किलोमीटर प्रवास केला. वापी, सुरत, अहमदाबाद (गुजरात) ते फालना, शिवगंज, वाकली, अंदुर, सादरी, मारवाडा जंक्शन, राणी, पाली, जोधपुर (राजस्थान) या भागांत कसून शोध घेण्यात आला.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतल्यानंतर, मुलींपैकी एक राजस्थानमधील राणी येथे तर दुसरी राजस्थानमधील पाली येथे सुखरूप आढळून आली.

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणारे संशयित आरोपी, १) सुरेशकुमार वडदाराम प्रजापती (वय २१ वर्षे, रा. राणी, राजस्थान) आणि २) सुरेशकुमार मोहनलाल राणाभील (वय ३१ वर्षे, रा. राणी, राजस्थान) यांना पोलिसांनी तत्काळ अटक करून जेरबंद केले आहे. पोलिसांनी दोन्ही पीडित अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

​पुणे शहर पोलीस आयुक्त.अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस आयुक्त.मनोज पाटील (पुर्व प्रादेशिक विभाग),पंकज देशमुख (गुन्हे), पोलीस उप-आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर (परिमंडळ-५) आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार काळेपडळ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली आहे.