माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
अकलूज (प्रतिनिधी):महिला बस वाहकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून, मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन तरुणांना माळशिरस जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. आरोपी गणेश कृष्णदेव पवार आणि योगेश पोपट गोडसे दोघे रा. बाभुळगाव, ता. माळशिरस यांना विविध कलमान्वये २ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना २ फेब्रुवारी २०१८ रोजी अकलूज नवीन बसस्थानकात घडली होती.दिपाली अष्टेकर या सांगोला-अकलूज बसवर वाहक म्हणून कार्यरत होत्या. बस फलाट क्रमांक ३ वर उभी असताना प्रचंड गर्दी होती. वाहक अष्टेकर यांनी प्रवाशांना बसमध्ये जागा नाही, उभे राहून प्रवास करावा लागेल असे सांगितले याचा राग धरून आरोपींनी तुला काय करायचे आहे, तुझ्या मांडीवर बसून न्यायचे आहे का? असे म्हणून अत्यंत हीन भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. बस मार्गस्थ होत असताना पुन्हा बस थांबवून आम्हाला वेळापूरला जायचे आहे असे म्हणत त्यांनी अष्टेकर यांना दोन्ही हाताने व गळ्यावर मारहाण केली.यावेळी चालक तानाजी केंगार,महेश पावसे व इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत सोडवासोडव केली.
घटनेनंतर तात्काळ वाहतूक नियंत्रक कक्षात नेऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. अकलूज पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार बाबासाहेब भातुंगडे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. हुली यांच्यासमोर या केसची सुनावणी झाली. फिर्यादी दिपाली अष्टेकर, साक्षीदार सूर्यकांत सलगर, महेश पावसे, डॉ. सुनील नरुटे आणि तपास अधिकारी यांच्या साक्षी या प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोन्ही आरोपींना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली
कलम ३५३: २ वर्षे सश्रम कारावास आणि २००० रुपये दंड.
कलम ३३२: २ वर्षे सश्रम कारावास आणि २००० रुपये दंड.
कलम ५०४: ६ महिने सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड.
या खटल्यात सरकारी वकील संग्राम एस. पाटील व शांतीनाथ मेंढेगिरी यांनी प्रभावी काम पाहिले. त्यांना कोर्ट पैरवी पोलीस हवालदार रियाज तांबोळी आणि हरीष भोसले यांनी सहकार्य केले. या कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

