Breaking

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

बळपुडीचे पोलीस पाटील प्रमोद राणबा पाटील यांना 'आदर्श पोलीस पाटील' पुरस्कार जाहीर


​नालंदा ऑर्गनायझेशनचा 'ग्रामसमृद्धी सन्मान'; १४ फेब्रुवारीला पुण्यात होणार सोहळा


​इंदापूर:ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे बळपुडी (ता. इंदापूर) गावचे पोलीस पाटील श्री. प्रमोद राणबा पाटील यांना २०२६ सालचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे. नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या वतीने आयोजित ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२६ मध्ये त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.नालंदा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षीचा हा दिमाखदार सोहळा  १४ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.  इंदापूर तालुक्यातून आदर्श पोलीस पाटील म्हणून प्रमोद राणबा पाटील यांची झालेली निवड ही तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब मानली जात आहे.


प्रमोद पाटील यांनी बळपुडी ग्रामपंचायत हद्दीत पोलीस प्रशासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. त्यांच्या याच सामाजिक कार्याची आणि प्रशासकीय चोख कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.

​हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रमोद राणबा पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बळपुडी ग्रामस्थ, इंदापूर तालुक्यातील विविध संघटना आणि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


​हा पुरस्कार माझ्या कामाला मिळालेली पावती असून, भविष्यात अधिक जोमाने सामाजिक सेवा करण्याची प्रेरणा यातून मिळेल,अशी भावना प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली.