Breaking

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

कुरवली येथे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या 'श्रम संस्कार' शिबिराचे उत्साहात उद्घाटन


कळंब येथील विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकीचा जागर; सात दिवस चालणार उपक्रम


​इंदापूर प्रतिनिधी: गणेश धनवडे

ग्रामीण भागातील तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय (कळंब) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुरवली येथे १८ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर पार पडणार आहे.

​या विशेष शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप हेगडे आणि कुरवली ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल हनुमंत चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कुरवली गावातील ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

​उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी मत व्यक्त केले की, शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनातील समस्या जवळून अनुभवता येतात. श्रमदानातून गावाला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासोबतच स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची ही मोठी संधी आहे.

​याप्रसंगी  ​डॉ. अशोक काळंगे (प्राचार्य, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय) ​प्रा. ज्ञानेश्वर गुळीग (उपप्राचार्य) ​दत्तात्रय दणाणे (सदस्य, ग्रामपंचायत कुरवली)​प्रा.राजेंद्रकुमार डांगे (कार्यक्रम अधिकारी)​प्रा.सुवर्णा बनसोडे (सह-कार्यक्रम अधिकारी) याव्यतिरिक्त महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात विद्यार्थी विविध सामाजिक उपक्रम राबवणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्राम स्वच्छता मोहीम गावातील रस्ते आणि सार्वजनिक परिसराची स्वच्छता. आरोग्य, व्यसनमुक्ती आणि जलसंधारण विषयावर जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी मान्यवरांची व्याख्याने,गावातील विकासकामांत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.​या शिबिरामुळे कुरवली गावात उत्साहाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.