Breaking

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

माणुसकीचा धर्म सर्वात श्रेष्ठ! तांबवे गावात मंदिर-मशिदीच्या सानिध्यात गुंफले गेले सामाजिक ऐक्याचे नाते

तांबवे (प्रतिनिधी):आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभ्या केल्या जात आहेत, तिथे तांबवे गावाने संपूर्ण समाजासमोर 'सर्वधर्म समभावाचा' एक देदीप्यमान आदर्श ठेवला आहे. गावातील मंदिर आणि मशीद यांच्यात अवघ्या १५ ते २० फुटांचे अंतर आहे, परंतु येथील ग्रामस्थांच्या मनात मात्र धर्माचे कोणतेही अंतर उरलेले नाही. १६ वर्षांची परंपरा जपत, यंदाही मुस्लिम समाजाने अखंड हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून माणुसकी आणि एकात्मतेचे दर्शन घडवले.

तांबवे गावात गेल्या १६ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा केला जातो. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षीप्रमाणे एका दिवसाच्या कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाची संपूर्ण जबाबदारी गावातील मुस्लिम बांधव आनंदाने स्वीकारतात.यंदाही हाच वारसा पुढे नेत, हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत भक्तीचा हा सोहळा साजरा केला.


याप्रसंगी पुणे-राजगुरुनगर येथील झी मराठी फेम समाज प्रबोधनकार ह.भ.प. वैभव गावडे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले.यावेळी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त कृषी अधिकारी फकृद्दिन अहमद शेख  यांनी महाराजांना रोख रक्कम आणि शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केले. तर, सप्ताहातील एका दिवसाच्या संपूर्ण महाप्रसादाची जबाबदारी प्रा. अबूबकर महमंद शेख  यांनी उचलली होती. सप्ताहामध्ये तांबवे गावचे युवा वारकरी रत्न  ह.भ.प. भूषण घाडगे महाराज यांचेही प्रेरणादायी प्रवचन झाले. मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने वाटण्यात आलेला महाप्रसाद हा केवळ अन्नाचा घास नसून तो सामाजिक ऐक्याचा आणि बंधुभावाचा जिवंत संदेश ठरला आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहसान कृषी सेवा केंद्राचे युवा उद्योजक एजाज शेख, सतीश कोळेकर माजी उपसरपंच, क्रिएशन पेस्टिसाइड, मुस्लिम समाजाचे  जिलानी शेख, तसेच लतीफ शेख, कानिफ लवटे, मोनम शेख, असिफ अली शेख, दशरथ लवटे, सलीम खान, अस्लम मुलाणी, शब्बीर मुल्ला, जब्बार शेख आणि अब्दुल गणी शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.