Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

अकलूज येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणाचे धडे

प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी; 'हॅन्ड्स ऑन' प्रात्यक्षिकावर भर

माळीनगर (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. पहिल्या टप्प्यात २३०६ मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अकलूज येथे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले.​​यशवंतनगर (अकलूज) येथील स्मृतीभवन येथे शनिवारी, २४ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणाचे मुख्य नियोजन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार सुरेश शेजुळ व नायब तहसीलदार अमोल कदम यांनी केले.


​​मतदान प्रक्रिया निर्दोष पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांना दोन सत्रांत माहिती देण्यात आली निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चलचित्रफितीद्वारे (व्हिडिओ) प्रक्रियेची माहिती देण्यात आली. महर्षी प्रशाला येथे ५० झोनल ऑफिसर आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट (EVM) हाताळणीचे 'हॅन्ड्स ऑन' प्रात्यक्षिक घेण्यात आले. यासाठी २५ स्वतंत्र वर्ग खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती.निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही स्तरावर आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे दक्षता घ्यावी. अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

यावेळी सुरेश शेजुळ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार. प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, गटशिक्षणाधिकारी स्वरा महामुनी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर, निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण सुळ, महसूल तहसीलदार सिद्धनाथ जावीर, पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.