Breaking

रविवार, २५ जानेवारी, २०२६

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेकडून आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आदित्य सरवदेचा गौरव

अकलूज (प्रतिनिधी): बँकॉक (थायलंड) येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अकलूजच्या मातीतील मल्ल पै. आदित्य भागवत सरवदे याने देदीप्यमान कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या जागतिक यशाबद्दल महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांच्या हस्ते त्याचा विशेष सन्मान करण्यात आला.


आदित्य हा पुणे येथील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलनाचा पैलवान असून, तो अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार यांचा शिष्य आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून केवळ माळशिरस तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला आहे.

या सत्कार समारंभ प्रसंगी  सवतगावचे माजी सरपंच धनाजी जाधव, बबन काटकर, संजय दुणागे यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.आदित्यने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी अण्णासाहेब शिंदे यांनी व्यक्त केले.