अकलुज:सहकार क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सोलापुर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांची १०८ वी जयंती महर्षी संकुल,यशवंतनगर येथे अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभही मोठ्या दिमाखात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूजचे संचालक रामचंद्र गजाबा गायकवाड यांच्या हस्ते सहकार महर्षींच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. सूरज पवार, प्रमुख व्याख्याते साहित्यिक डॉ. प्रेमनाथ रामदासी आणि प्रशाला समितीचे सभापती अॅड. नितीनराव खराडे उपस्थित होते. प्रारंभी, महर्षी बाल वाद्यवृंदाच्या बालचमूंनी स्वागत गीताद्वारे पाहुण्यांचे उत्साहात स्वागत केले. प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सहकार महर्षींच्या कार्याचा गौरव केला.भविष्यातील पिढ्यांना नवचैतन्य आणि प्रेरणा देणारा झरा म्हणजे काकासाहेब होत. त्यांनी ग्रामीण भागातील सामान्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनी भूमिका कारमकर व श्रावणी मोहिते यांनी आपल्या ओघवत्या भाषणात काकासाहेबांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला महर्षी द्वैवार्षिक अंकाचे प्रकाशन आजच्या डिजिटल युगातही विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या आणि प्रशालेच्या गेल्या दोन वर्षांतील प्रगतीचा आलेख मांडणाऱ्या महर्षी या द्वैवार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. डॉ.प्रेमनाथ रामदासी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सहकार महर्षींनी प्रतिकूल परिस्थितीत सहकार आणि शिक्षणाचे जे रोपटे लावले, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता काकासाहेबांच्या जीवनातून जिद्द आणि कष्टाचे धडे गिरवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.तर डॉ. सूरज पवार यांनी विद्यार्थ्यांना यशाचे उत्तुंग शिखर गाठण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यात शैक्षणिक वर्षभरात विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राज्यस्तरीय लेझीम स्पर्धेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार रचना सतीश रणनवरे (सहशिक्षिका),आदर्श प्रयोगशाळा सहाय्यक पुरस्कार प्रकाश गोपीनाथ गवळी,उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षक पुरस्कार इलाही बागवान (सहशिक्षक) यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मकर संक्रांतीनिमित्त विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटपही करण्यात आले.
या प्रसंगी प्रशाला समिती सदस्य नवनाथ पांढरे, कैलास चौधरी, अनिल जाधव, विनोद जाधव, नितीन इंगवले, जया गायकवाड, मुख्याध्यापक शिवाजी पारसे, मुख्याध्यापिका अनिता पवार, उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक उमेश बोरावके यांनी मानले. सारे जहाँ से अच्छा या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.