Breaking

रविवार, ८ मार्च, २०२६

शिवजयंतीनिमित्त टणू येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; १०० हून अधिक रक्तदाते सहभागी

इंदापूर (विशेष प्रतिनिधी) महादेव मोहिते 

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मौजे टणू (ता. इंदापूर) येथे जय भवानी तरुण मंडळ व शिवछत्रपती प्रतिष्ठान मंडळ टणू (आडोबावस्ती) यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आडोबा वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पडलेल्या या उपक्रमात १०० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ‘स्वराज्य’ आणि ‘समाजसेवा’ या महाराजांच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम राबवण्यात आला. तरुणांसह अबालवृद्ध रक्तदात्यांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.

यावेळी आयोजक तथा निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व टणू ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रकाश शहाजी मोहिते म्हणाले, “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. या उपक्रमातून समाजाला मदतीचा हात देणे हाच आमचा उद्देश आहे. महाराजांच्या विचारांचा वारसा जपत रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मदत करणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना आहे.”

या उपक्रमाला वडापुरी-माळवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य यशराज भैय्या जगदाळे, लुमेवाडी पंचायत समिती गणाचे सदस्य शिवाजी विजयसिंह मोहिते (दादा पाटील), गोंदी गावचे सरपंच रणजित बापू वाघमोडे, रोहित जगदाळे, महादेव सूर्यवंशी आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.

यावेळी आरोग्य विभागाची टीम, वैद्यकीय अधिकारी तसेच राजेंद्र मोहिते, समीर मोहिते, नाथाजी मोहिते, अक्षय गोडसे, प्रकाश मोहिते, संदीप मोहिते, अमोल मोहिते, रविराज मोहिते, पांडुरंग (महाराज) मोहिते, नाना (नवनाथ) मोहिते, बापू भोसले, जगदीश सुतार, नितीन मोहिते, विकी गुजरे, विकी निंबाळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा पिण्याच्या पाण्याचे जार, इस्त्री व जर्कीन भेटवस्तू देऊन प्रमाणपत्रासह गौरव करण्यात आला. हा सामाजिक उपक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला