अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत वेगवेगळ्या तीन गंभीर गुन्ह्यांची उकल केली आहे. जबरी चोरी आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील आरोपींना अटक करून पोलिसांनी मुद्देमाल १०० टक्के हस्तगत केला आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे परिसरातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण झाला आहे. दिनांक ३ जून २०२६ रोजी फिर्यादी (रा. वायफळ, ता. जत, जि. सांगली) हे अकलूज येथील एका हॉटेलमधून जेवण करून एसटी स्टँडकडे चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी तुम्हाला एसटी स्टँडवर सोडतो असे सांगून विश्वासाने गाडीवर बसवले. मात्र स्टँडवर न नेता त्यांनी फिर्यादीला तांबोळी वसाहत, गिरमेवस्ती येथील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे फिर्यादीला काठीने मारहाण करून त्यांच्या खिशातील ९९,३५० रुपये रोकड जबरदस्तीने चोरून नेली होती. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०३/२०२६ (बी.एन.एस.क. ३०९(६), ३(५)) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपी १) सुनील भीमराव भिंगारदिवे (रा. राऊतनगर, अकलूज, माळशिरस) २) आजिनाथ नागनाथ गिरी (रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) ३) संतोष महादेव गायकवाड (रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेली ९९,३५० रुपयांची संपूर्ण रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत. तसेच अकलूज नवीन बस स्थानक येथून टेंभुर्णीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना एका अज्ञात चोराने फिर्यादीच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली होती. याप्रकरणी गु.र.नं. ३६३/२०२६ (बी.एन.एस.क. ३०४(२)) नुसार गुन्हा दाखल होता. तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी पाथर्डी परिसरातून दोन आरोपींना अटक केली. आरोपी १) सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामनगाव देवी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
२) शुभम गोरक्ष चव्हाण (रा. इंदिरानगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेली ९४,००० रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन १०० टक्के हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. शिवकुमार मदभावी करत आहेत.
फिर्यादी महिला (रा. माळखांबी, ता. माळशिरस) या आपल्या शेतातून जनावरांसाठी चारा डोक्यावरून घेऊन जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. फिर्यादी काही समजण्याच्या आतच त्यांनी गळ्यातील ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेला पत्ता (दागिना) हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी गु.र.नं. ३५४/२०२६ (बी.एन.एस.क. ३०४, ३(५)) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.
आरोपी १) बालाजी हनुमंत पवार (रा. पवारवस्ती, खेडभोसे, ता. पंढरपूर) २) पंडीत सुभाष होळकर (रा. वोळे, ता. पंढरपूर) आरोपींकडून चोरीला गेलेला ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा पत्ता आणि गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल पोलिसांनी १०० टक्के हस्तगत केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवा. राहुल रणवरे करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (अकलूज विभाग) संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पो.हवा. शिवकुमार मदभावी, विक्रम घाडगे, विनोद साठे, सुहास क्षीरसागर, राहुल रणवरे, विशाल पोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरात, पंडीत गबले, प्रविण काळे यांनी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाण्याचे प्रविण मेटकरी व राहुल सोनकर यांनी तांत्रिक सहाय्य केले.

