अकलूज (प्रतिनिधी): अकलूज पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कारवाई करत घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण १०,९२,२२० रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे.
८ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२६ दरम्यान नेवरे (ता. माळशिरस) येथील फिर्यादी जितेंद्र जयंतराव इनामदार यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरातील सुमारे १,५५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण (CDR) आणि बातमीदारांच्या मदतीने संशयित आरोपी सागर दिलखुश काळे (वय ३६, रा. जळोळी, पंढरपूर) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपले साथीदार आकाश उर्फ पप्पण्या संभाजी चव्हाण (वय ३५) आणि सुरज उर्फ दम्या रवि चव्हाण (वय २४, दोघे रा. पडसतळ, सांगवी, ता. पंढरपूर) यांच्या मदतीने नेवरे, यशवंतनगर व स्वरूपनगर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने त्यांनी करकंब येथील श्रीराम गोल्ड व सिल्व्हर पॅलेसचे मालक शिवराज दीपक गोडसे याला विकल्याचे निष्पन्न झाल्याने, सोनाराकडून सुमारे ९,८२,२२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
फरार आरोपी आकाश चव्हाण व सुरज चव्हाण हे राहत्या घरी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ११ सप्टें. २०२६ रोजी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उनि. विशाल कदम, पो.हे.कॉ. विनोद साठे, शिवकुमार मधभावी, राहुल रणनवरे, तुषार (बबलू) गाडे, दत्तात्रय खरात, अनुराधा आडगळे, सोमनाथ माने, पंडित गवळी, तुकाराम माने-देशमुख, विजय तवटे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अजित सुरवसे व स्वप्निल जाधव यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करत आहेत.

