Breaking

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२६

माळीनगरमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न; गणेशोत्सवात डीजे-डॉल्बी लावल्यास पोलीस करणार कडक कारवाई!

 ​

माळीनगर ( प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवणाऱ्या आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर अकलूज पोलीस आता कडक मोर्चा वळवणार आहेत. माळीनगर बीट मधील सर्व गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि शांतता कमिटीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आज सायंकाळी ६:०० वाजता माळीनगर येथे पार पडली. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत आक्रमक व स्पष्ट शब्दांत नियमावली जाहीर केली.

​


बैठकीत गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना थेट शब्दांत बजावण्यात आले की, यंदाचा गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत डीजे किंवा डॉल्बीच्या कानाठळ्या बसवणाऱ्या आवाजात साजरा करता येणार नाही.महाराष्ट्राची वैभवशाली संस्कृती व परंपरा जपत ढोल-ताशा, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरातच श्रींचे आगमन व विसर्जन झाले पाहिजे, असे स्पष्ट मत पोलीस निरीक्षक उबाळे यांनी मांडले.

​


नियमांचे उल्लंघन करून कोणीही अनधिकृतपणे डीजे किंवा डॉल्बी सिस्टीम लावल्यास पोलिसांकडून कोणतीही गय केली जाणार नाही. नियम मोडणाऱ्या मंडळाचे पदाधिकारी आणि डीजे मालक या दोघांवरही तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशाराच पोलीस प्रशासनाने दिला आहे.