Breaking

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून पूरग्रस्त 'सायली-कोयल'ला लॅपटॉप भेट; मदतीच्या ओलाव्याने दिवाळी पाडवा झाला खास!

 


विशेष प्रतिनिधी...महादेव मोहिते 

तिहे (उत्तर सोलापूर): आपल्या मतदारसंघाशी कोणताही थेट संबंध नसतानाही, माणुसकीच्या नात्याने धाव घेत मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे येथील पूरग्रस्त गरजू विद्यार्थिनींना अमूल्य भेट दिली आहे. सप्टेंबर महिन्यात आलेल्या महापुरात ज्या दोन बहिणींचे स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले होते, त्यांना दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत खासदारांनी नवीन लॅपटॉप, सॅक आणि मिठाई भेट देऊन मदतीचा हात दिला. 

सप्टेंबर महिन्यात आलेल्या विनाशकारी पुरामुळे तिहे, ता. उत्तर सोलापूर येथील निवृत्ती गायकवाड यांच्या दोन्ही कन्या, सायली आणि कोयल गायकवाड, यांचे मोठे नुकसान झाले होते. या दोन्ही बहिणींच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लागणारे लॅपटॉप आणि सर्व पुस्तके पुरात वाहून गेली होती. या दुर्दैवी घटनेची बातमी ‘२४ तास’ वृत्तवाहिनीवर प्रसारित झाली.ही बातमी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांची मुलगी राजुल पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. शैक्षणिक साहित्याचे झालेले नुकसान पाहून त्यांनी तात्काळ मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी मैंदर्गी येथील रहिवासी आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिलीचा व्यवसाय करणारे विश्वनाथ पाटील यांच्या सहकार्याने तिहे येथील गायकवाड कुटुंबियांचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्यानंतर खासदारांनी दोन्ही विद्यार्थिनींना लॅपटॉप भेट देण्याचे निश्चित केले.

आज, दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खासदारांचे प्रतिनिधी निवृत्ती गायकवाड यांच्या नवगिरे वस्तीवरील निवासस्थानी पोहोचले, जिथे निवृत्ती गायकवाड हे शेतमजुरीचे काम करतात. यावेळी सायली आणि कोयल यांना नवीन लॅपटॉप, लॅपटॉप सॅक आणि मिठाई भेट देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक यशासाठी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या छोटेखानी आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमप्रसंगी विश्वनाथ पाटील वकील, राजशेखर चौधरी, तिहेचे सरपंच गोवर्धन जगताप, दत्तात्रय नारायण सुरवसे, शंकर गायकवाड, दत्तात्रय मल्लाव, देवानंद करवीर, निवृत्ती गायकवाड आणि संपूर्ण गायकवाड कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांची मुलगी राजुल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे गायकवाड कुटुंबीय व उपस्थित सर्वांशी संवाद साधला. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दोन्ही मुलींना भावी यशासाठी सुयश चिंतील. तसेच, शिक्षणासाठी भविष्यात कोणतीही अडचण आल्यास या दोन्ही भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निश्चय त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्रीमंत बनसोडे सर यांचेही या कार्यात सहकार्य लाभले.

आपल्या मतदारसंघाशी संबंध नसतानाही खासदारांनी दाखवलेल्या या औदार्यशील धोरणामुळे संपूर्ण गायकवाड कुटुंब गहिवरून गेले होते. खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या या मदतीमुळे पूरग्रस्त सायली आणि कोयल यांना पुन्हा एकदा आपले शैक्षणिक ध्येय गाठण्याची प्रेरणा आणि बळ मिळाले आहे.