Breaking

बुधवार, २२ ऑक्टोबर, २०२५

काळजी घ्या! संत तुकाराम पालखी महामार्गावरील पंचवटी चौकात वाढले जीवघेणे अपघात.

 


विशेष प्रतिनिधी...गणेश साठे मो.7020250488

अकलूज/ माळीनगर: संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील माळीनगर/अकलूज येथील 'पंचवटी चौक' आता स्थानिकांसाठी आणि प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. या चौकात अपघातांची मालिकाच सुरू झाली असून, गेल्या काही महिन्यांत येथे झालेले अनेक गंभीर अपघात प्रशासनाच्या निष्काळजीपणाकडे लक्ष वेधून घेत आहेत.महामार्ग प्रशस्त झाला असला तरी,या विशिष्ट चौकातील सदोष रचनेमुळे अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.


 संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम झाल्यावर रस्त्याचा दर्जा सुधारला.मात्र, माळीनगर/अकलूज पंचवटी चौकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. स्थानिक नागरिक आणि अपघातग्रस्तांच्या म्हणण्यानुसार, हा चौक अत्यंत वर्दळीचा असूनही, येथे असुरक्षित वळण आणि  महामार्गावरून येणारी भरधाव वाहने चौकात वेगाने येतात, परंतु येथे प्रभावी गतिरोधक नाहीत.


सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांना सुरक्षित मार्ग मिळत नाही,ज्यामुळे अचानक ब्रेक लावावे लागतात आणि अपघात होतात.या समस्येची गांभीर्यता दर्शवणारी अलीकडची घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी याच चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.अशा प्रकारच्या घटना येथे वारंवार घडत आहेत. चौपाटी फाटा, वासुंदे उड्डाण पूल अशा महामार्गावरील इतर ठिकाणीही अपघाताची नोंद झाली असली तरी, पंचवटी चौकात धोक्याची पातळी सर्वाधिक आहे.


पंचवटी चौकातील जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.चौकात तात्काळ सिग्नल व्यवस्था सुरू करावी. तसेच प्रभावी आणि प्रमाणित गतिरोधक बसवावेत. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास, संत तुकाराम पालखी महामार्गावरील हा 'पंचवटी चौक' आणखी किती निष्पाप लोकांचा बळी घेणार, हा प्रश्न कायम आहे. प्रवाशांनी या धोकादायक चौकातून जाताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.