Breaking

मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई!


पुणे:आगामी  निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार शहरभर कोंबिंग ऑपरेशन राबवले जात आहे. याच मोहिमेअंतर्गत, काळेपडळ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित केले. पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि दाऊद सय्यद यांना त्यांच्या बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार, आशिफ सबीरखा तेली (वय २१, रा. सय्यदनगर, हडपसर) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार त्याचे दोन साथीदार यश सुभाष मदने (वय २०, रा. बारामती) आणि प्रथमेश संदीप लोंढे (वय २४, रा. बारामती) यांच्यासह महंमदवाडी येथील हेवनपार्क आणि लक्ष्मीपार्ककडे जाणाऱ्या पालखी रोड मार्गावरील कच्च्या रस्त्यावर संशयास्पदरीत्या थांबलेला होता. त्यांच्याकडे काहीतरी संशयित वस्तू असून ती अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती.

माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच तिन्ही आरोपी कावरेबावरे झाले. पोलिसांनी त्यांना चोहोबाजूने घेराव घालून ताब्यात घेतले. पंचांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून एकूण ०४ गावठी पिस्तूल आणि ०५ जिवंत राऊंड  असा एकूण ₹२,४२,०००/- (दोन लाख बेचाळीस हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही आरोपींविरुद्ध काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम ३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) आणि मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताबडतोब अटक करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ५) यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पो.उप.निरी. विनायक गुरव आणि प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.