अकलूज (प्रतिनिध) गणेश साठे
मो.9850601128
अकलूज, दि.२६ नोव्हेंबर: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ आणि भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून, अकलूज पोलीस ठाणे आणि 'दि आर्ट ऑफ लिव्हिंग', अकलूज शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
अकलूज पोलीस स्टेशनच्या आवारात आयोजित या शिबिरामागे 'रक्तदान श्रेष्ठदान' आणि 'रक्तदान म्हणजे माणुसकीची पूजा' हा उदात्त हेतू होता. याप्रसंगी २६/११ च्या हल्ल्यातील शहीद वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शिबिराच्या ठिकाणी 'दि आर्ट ऑफ लिव्हिंग'चे प्रणेते श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेसमोर आदराचे प्रतीक म्हणून आसनस्थ व्यवस्था करण्यात आली होती.
अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. सकाळी ८:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत चाललेल्या या शिबिरात पोलीस अधिकारी, कर्मचारी, 'दि आर्ट ऑफ लिव्हिंग'चे स्वयंसेवक आणि परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. धनंजय देशमुख, श्री. माऊली मुंडफणे तसेच अकलूज पोलीस ठाणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराने विशेष परिश्रम घेतले. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि संविधानाच्या सन्मानार्थ आयोजित या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

