Breaking

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

अकलूज नगरपरिषदेचे रणशिंग फुंकले! महायुती-महाआघाडीत जोरदार हालचाली!


अकलुज: राज्यातील नगरपरिषदा व नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नव्याने स्थापित झालेल्या अकलूज नगरपरिषदेसाठी  पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केवळ बारा दिवसांचा प्रचार कालावधी मिळणार असल्याने, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गोटांमध्ये जागावाटप आणि निवडणूक धोरणांसाठी कमालीची उत्सुकता आणि हालचालीस वेग आला आहे. सन १९२२ मध्ये स्थापन झालेल्या  अकलूज ग्रामपंचायतचे ३ ऑगस्ट २०२१ रोजी नगरपरिषदेत रूपांतर झाले. तब्बल तीन वर्षांनंतर आता या नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदेसाठी पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत आहे, ज्यामुळे या निवडणुकीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना आणि पक्षांना केवळ बारा दिवसांचा अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांना कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि रणनिती आखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महायुती आणि महाआघाडीमध्ये आता 'जागा वाटप' आणि 'उमेदवार निश्चिती' साठी बैठका आणि चर्चांना वेग आला आहे.अकलूज ग्रामपंचायतीवर मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील एकहाती सत्ता राहिली आहे.एकीकडे मोहिते पाटील गटाची पारंपरिक पकड आणि दुसरीकडे महायुतीची वाढलेली राजकीय शक्ती,यांमुळे अकलूज नगरपरिषदेची ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होणार हे निश्चित झाले आहे. दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक भविष्यातील राजकीय वाटचालीस दिशा देणारी ठरणार आहे.