Breaking

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

पुरोगामी चळवळीचा आधारस्तंभ हरपला !


शेतकरी, कामगार आणि उपेक्षितांच्या हक्कांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ समाजवादी चिंतक आणि पुरोगामी चळवळीला दिशा देणारे बाबा आढाव यांचे वयाच्या ९३व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एका संघर्षमय पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

समाजातील विषमता आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी बाबा आढाव यांनी सुरू केलेली एक गाव ,एक पाणवठा ही मोहीम महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल ठरली. पाणी सर्वांसाठी खुले करण्याच्या या मोहिमेतून त्यांनी अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध दिलेला लढा आजही तितकाच प्रेरणादायी आहे.

वयाच्या ९३व्या वर्षीही त्यांनी लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी अत्यंत परखड भूमिका घेतली आणि संघर्षाची मशाल प्रज्वलित ठेवली. जनसामान्यांच्या आशा-आकांक्षा आणि न्याय्य हक्कांसाठी ते शेवटच्या श्वासापर्यंत लढणारे एक निष्ठावान व्यक्तिमत्त्व होते,​त्यांच्या निधनाने पुरोगामी आणि समाजवादी विचारधारेसाठी मोठी हानी झाली आहे. कष्टकरी, कामगार आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य तसेच त्यांची संघर्षमय वाटचाल महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना कायम प्रेरणा देत राहील.

बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!