निमसाखर(प्रतिनिधी) - गणेश धनवडे
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील दत्त मंदिर परिसरात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ग्राम प्रदक्षिणा आणि नवीन साहित्याचे लोकार्पण सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला. ग्राम प्रदक्षिणा आणि नवीन संकल्प
उत्सवाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची गावातून भव्य ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून स्वामींच्या आरतीसाठी नवीन पालखी आणि स्वयंचलित नगारा मशीन आणण्यात आली आहे. या साहित्याचा लोकार्पण सोहळा निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
संध्याकाळी ह.भ.प. श्रीकांत महाराज गलांडे यांचे 'स्वामी चरित्र' या विषयावर अभ्यासपूर्ण प्रवचन झाले. यावेळी वालचंद नगरचे स्वामीभक्त राम कुंभार सर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पत्रकार गणेश धनवडे यांचा गलांडे महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यासाठी निमसाखर आणि परिसरातील स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. सुनील हनुमंतराव मोरे यांच्या वतीने सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.

