३५०० हून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाची नवी दिशा
मुख्य संपादक:रियाज मुलाणी
माळीनगर:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने, रोटरी क्लब अकलूज यांच्या वतीने माळीनगर येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीच्या ४ शाळांना ई-लर्निंग स्मार्ट टीव्ही प्रणाली भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे परिसरातील ३५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट अधिक सुकर आणि रंजक होणार आहे. हा लोकार्पण सोहळा रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि सासवड माळी शुगर फॅक्टरी व एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमे होते. यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अजय गिरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष रो. केतन बोरावके, सचिव रो. अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख रो. कल्पेश पांढरे यांच्यासह रो. नवनाथ नागणे, रो. सीए नितीन कुदळे, रो. गोमटेश दोशी, रो. दिपक फडे, रो. ओजस दोभाडा, रो. अभिषेक टेके, रो. अजित वीर आणि गुलमोहर इंग्लिश मीडियमचे प्राचार्य वसंत आंबोडकर उपस्थित होते. ई-लर्निंग प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न मिळता, दृकश्राव्य (Audio-Visual) माध्यमातून विषय समजून घेणे सोपे होणार आहे. क्लिष्ट विषय चित्रांच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून लवकर समजतील,ग्रामीण भागातील मुले शहरांतील मुलांच्या बरोबरीने स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतील,शिक्षकांनाही नवनवीन शैक्षणिक साधने वापरता येतील.
"दृकश्राव्य माध्यमामुळे शिक्षण अधिक सोपे आणि प्रभावी होते. या स्मार्ट टीव्ही प्रणालीमुळे ग्रामीण भागातील ३५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल आणि त्यांना स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल."
— रो. सुधीर लातूरे (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, रोटरी ३१३२)


