अकलुज: शिवजयंती २०२६ च्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या आवाजात डीजे (DJ) आणि लेझर शो लावणाऱ्या ११ मंडळांसह संबंधित डीजे मालकांवर अकलुज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शांततेचा भंग आणि ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कडक कारवाई करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी बैठका घेऊन मंडळांना पारंपारिक वाद्यांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. तसेच, अकलुजचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांनी स्थानिक मंडळांना नोटिसा बजावून ध्वनी पातळी मर्यादेत ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, २० फेब्रुवारी रोजी झालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक मंडळांची ध्वनी पातळी (Decibels) धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त असल्याचे आढळले. प्रामुख्याने खालील मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे
मंडळाचे नाव ध्वनी पातळी (dB)
१ संभाजीराजे प्रतिष्ठान, अकलुज १२५ dB
२ रामरहिम प्रतिष्ठान, अकलुज ११८ dB
३ नवक्रांती प्रतिष्ठान, अकलुज ११७ dB
४ लहुजी साम्राज्य प्रतिष्ठान, अकलुज ११५ dB
५ स्वराज्य प्रतिष्ठान, यशवंतनगर ११२ dB
६ शिवदत्त प्रतिष्ठान, अकलुज ११० dB
७ शिवमुद्रा प्रतिष्ठान, अकलुज ११० dB
८ हिंदवी प्रतिष्ठान, अकलुज १०८ dB
९ महाराज प्रतिष्ठान, अकलुज १०७ dB
१० सहयाद्री प्रतिष्ठान, अकलुज १०५ dB
११ छावा ग्रुप, अकलुज १०५ dB
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधित मंडळांवर भारतीय न्याय संहिता २०२३, ध्वनी प्रदूषण अधिनियम २००० आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता धोक्यात आणणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी ही धडक मोहीम राबवली असून, या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पोलिसांनी यापूर्वीच सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.

