अकलूज (प्रतिनिधी )गुन्हेगारांना जरब बसवत अकलूज पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. पाटीदार मंगल कार्यालय परिसरातून चोरीला गेलेली चारचाकी वाहन अवघ्या २४ तासांच्या आत शोधून काढत, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली. बागेचीवाडी ता. माळशिरस येथील रहिवासी आणि व्यावसायिक आचारी दिलीपशिंग नरेंद्रशिंग राजपूत यांची इको कार MH 45/AQ 8970 १ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री अकलूज बायपास रोडवरील पाटीदार मंगल कार्यालयासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आकाश रामभाऊ रोकडे (वय २७, रा. वाघोली, पुणे) याला गाठले. अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला वाहनासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
ही यशस्वी कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निरज उबाळे,पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, विनोद साठे, पंडित गवळे, बबलू गाडे, सायबर सेलचे निक्स पवार, यांचा समावेश होता .सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी हे करत आहेत.

