Breaking

सोमवार, २९ जून, २०२६

RTI कायद्याची गळचेपी? नव्या नियमांविरोधात बहुजन ब्रिगेड महासंघ आक्रमक


माहिती अधिकार नियम २०२६ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन छेडणार! 'बहुजन ब्रिगेड महासंघ' शासनाविरोधात आक्रमक; पुणे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

​महाराष्ट्र शासनाने नुकत्याच लागू केलेल्या माहिती अधिकार नियम २०२६ मधील नागरिक विरोधी तरतुदी तात्काळ मागे घेण्यात याव्यात, या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने पुणे येथे जोरदार आवाज उठवण्यात आला आहे. या संदर्भात महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सविस्तर तक्रारी निवेदन सादर करण्यात आले. 


शासनाने हे जाचक नियम जबरदस्तीने लादल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात महासंघाने शासनाच्या नव्या धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. माहिती अधिकार कायदा २००५ हा सर्वसामान्य नागरिकांना शासनाला जबाबदार धरण्याचे आणि पारदर्शकता आणण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. मात्र, नव्या २०२६ च्या नियमांमुळे हा कायदा अधिक गुंतागुंतीचा, खर्चिक आणि सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.


​​नव्या नियमांनुसार, अपील किंवा सुनावणीच्या वेळी अर्जदाराला वकील अथवा तज्ज्ञांची मदत घेण्यास मनाई करण्यात आली आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक असून नागरिकांच्या न्याय प्रवेशाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे, असा आरोप संदिप  मोहिते यांनी केला आहे. कायद्याचे गुंतागुंतीचे प्रश्न मांडताना नागरिकांना त्यांच्या पसंतीच्या वकिलांची मदत नाकारणे हे लोकशाही मूल्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे. ​

याशिवाय, नव्या नियमावलीत अर्जदाराकडून ओळखपत्राची मागणी करणे, माहिती मागण्यामागचे कारण विचारणे आणि विविध शुल्कांमध्ये मोठी वाढ करणे अशा तरतुदी समाविष्ट आहेत. या सर्व तरतुदी माहिती अधिकार कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या आहेत. माहिती अधिकार हा शासनाची कृपा नसून नागरिकांचा सनदशीर व कायदेशीर अधिकार आहे, त्यामुळे या अधिकारावर कोणतेही निर्बंध लादू नयेत,अशी मागणी बहुजन ब्रिगेड महासंघाने केली आहे.

​​शासनाने जर हे नवीन नियम आणि जाचक अटी नागरिकांवर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केला, तर बहुजन ब्रिगेड महासंघाच्या वतीने संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात सनदशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संस्थापक अध्यक्ष संदिप मोहिते यांनी दिला आहे. ​यावेळी बहुजन ब्रिगेड महासंघाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.