Breaking

रविवार, १२ जुलै, २०२६

गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि 'अलख' निरंजनचा गजर; टणू येथे श्री भर्तरीनाथ भंडारा उत्सव उत्साहात संपन्न!


​इंदापूर (विशेष प्रतिनिधी, महादेव मोहीते):

पुणे जिल्ह्यातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या इंदापूर तालुक्यातील टणू येथे नवनाथांपैकी एक असलेल्या श्री भर्तरीनाथांचा वार्षिक भंडारा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. "अलख निरंजन" अशा नवनाथांच्या जयघोषात आणि गुलाल-खोबऱ्याची उधळण करत हजारो भाविकांनी श्री भर्तरीनाथांच्या चरणी माथा टेकवला. या उत्सवासाठी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मुंबई यांसह विविध जिल्ह्यांतून व प्रांतांतून नोकरी-व्यवसाय निमित्त बाहेर गेलेले गावकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


​उत्सवाच्या परंपरेनुसार, आदल्या रात्री वारकरी संप्रदायाच्या वतीने रात्रभर हरिनामाचा जागर करण्यात आला. भजनाच्या सुरांनी संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. दुसऱ्या दिवशी पहाटेपासून मंदिरात विविध विधीवत धार्मिक पूजापाठ आणि अभिषेक करण्यात आले. ​दुपारी ठीक १२ वाजता पारंपरिक नियमांनुसार, भंडाराघर यांच्या मानाचा नैवेद्य ढोल-ताशा, लेझीम आणि हलगीच्या कडकडाटात, तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरात आणण्यात आला. नैवेद्य मंदिरात दाखल होताच भाविकांनी एकच जयघोष केला. त्यानंतर महाआरती करून उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


टणू गावच्या या भंडारा उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेला कोणताही राजकीय रंग नसतो. इतिहासात आजपर्यंत येथे कोणतीही यात्रा कमिटी किंवा पुढारी नसून, सर्व जाती-धर्मातील ग्रामस्थ एकत्र येऊन, स्वयंस्फूर्तीने आणि स्वइच्छेने हा दिमाखदार सोहळा पार पाडतात. गावकऱ्यांचा हा एकोपा आणि व्यवस्थापन संपूर्ण पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरत आहे.

​या ​उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे टणू आणि पंचक्रोशीतील गावांच्या लेकी-बाळी (माहेरवाशिणी) आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहतात. त्यांच्यासाठी हा सोहळा म्हणजे एक मोठी पर्वणीच असते. अनेक भाविकांनी व माता-भगिनींनी श्री भर्तरीनाथांच्या चरणी मनोभावे आपली नवसपूर्ती केली.

​​समस्त टणू ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने महाप्रसादाचे (अन्नदान) आयोजन करण्यात आले होते. अन्नदानाचा दर्जा आणि गावकऱ्यांची पाहुणचार करण्याची पद्धत पंचक्रोशीत प्रसिद्ध असून, यंदाही त्यात कोणतीही कमतरता भासू दिली नाही.

​भंडारा उत्सवानिमित्त मंदिराबाहेर खेळणी, मिठाई आणि विविध साहित्यांचे शेकडो स्टॉल्स लागले होते. भाविक, महिला आणि बालचमूंनी या बाजारात मोठी खरेदी केल्याने यात्रेत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. प्रशासकीय आणि ग्रामस्थांच्या चोख नियोजनामुळे हजारो भाविकांनी रांगेत उभे राहून शिस्तीत दर्शन घेतले आणि हा सोहळा शांततेत पार पडला.