Breaking

रविवार, २६ जुलै, २०२६

विद्यार्थ्यांच्या हक्कांचा दिल्लीत आवाज घुमवला! माळीनगरच्या तरुणाईचा गौरव

माळीनगर (विशेष प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, शैक्षणिक प्रश्नांच्या समाधानासाठी आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर  दिल्ली येथे अभिजित दिपके, सोनम वांगचुक, नेहा बोरा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनाला देशभरातील युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. माळीनगर येथील लखन बेंद्रे, समाधान वजाळे, वैष्णवी खिलारे आणि तनुजा साळूखे यांनी दिल्ली गाठून जंतर-मंतरवरील आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.या आंदोलकांचा माळीनगर येथे संविधानाची प्रत, उद्देशिका आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी उपस्थित  वक्त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीपर्यंत जाऊन संघर्ष करणाऱ्या या युवक-युवतींनी समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. सत्काराला उत्तर देताना आंदोलक कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आंदोलनाचे अनुभव उपस्थितांसमोर मांडले. त्यांनी सांगितले की, अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखालील हा लढा केवळ काही मागण्यांसाठी नव्हता, तर तो लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानिक अधिकारांच्या संरक्षणासाठी होता. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या युवकांनी या आंदोलनात सहभाग घेत एकजुटीची ताकद दाखवून दिली. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर माळीनगरमधील समाजबांधवांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला उर्जादायी ठरले. हा सत्कार आमचा नसून लोकशाही आणि संविधानावर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे.”

 कार्यक्रमादरम्यान लोकशाही, सामाजिक न्याय आणि संविधानाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आंदोलकांचे स्वागत करत त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले.