अकलूज (प्रतिनिधी):
रोटरी क्लब ऑफ अकलूजच्या आगामी रोटरी वर्ष २०२७-२८ च्या अध्यक्षपदी रो.कल्पेश पांढरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर सचिव पदी रो. राजीव बनकर यांची निवड झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या क्लबच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीबद्दल ३१३२ चे प्रांतपाल रो. क्षितिज झावरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रो. कल्पेश पांढरे यांनी गेल्या अनेक वर्षांत रोटरीच्या माध्यमातून विविध पदांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. रोटरी वर्ष २०२३-२४ मध्ये त्यांनी सचिव पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळताना अनेक सामाजिक व लोकोपयोगी प्रकल्प राबवले होते. त्यांचे नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, अभ्यासू वृत्ती आणि संस्थेप्रती असलेली निष्ठा विचारात घेऊन त्यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
रो. कल्पेश पांढरे यांचा सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनुभव अत्यंत दांडगा आहे. ते गेल्या ९ वर्षांपासून 'दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी'च्या संचालक पदावर कार्यरत आहेत.'अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था, पुणे' या संस्थेच्या सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते गेल्या ११ वर्षांपासून जबाबदारी सांभाळत आहेत. महात्मा फुले दूध डेअरी (गट नंबर २) चे संचालक व माजी चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच, कृषी क्षेत्रासह गेल्या २१ वर्षांपासून ते विमा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत.
आपल्या निवडीनंतर बोलताना रो. कल्पेश पांढरे म्हणाले, रोटरी क्लब ऑफ अकलूजने नेहमीच समाजोपयोगी उपक्रमांत अग्रेसर भूमिका घेतली आहे. आगामी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील गरजूंना थेट मदत पोहोचवणाऱ्या प्रकल्पांवर आमचा विशेष भर असेल. क्लबच्या सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांना व सदस्यांना सोबत घेऊन हे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील."
या निवडीचे वृत्त समजताच अकलूज शहरासह संपूर्ण तालुक्यातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडून रो. कल्पेश पांढरे व रो. राजीव बनकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोटरी क्लब ऑफ अकलूज परिवारातील सर्व सदस्यांनी व माजी अध्यक्षांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

