अकलूज: सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात एक मोठी आणि धाडसी कारवाई केली आहे. अवैध अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत अकलूज पोलिसांनी १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि एक टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली. तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर अवैध अग्निशस्त्रे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली. आरोपींकडे ही शस्त्रे बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे
विकास कैलास वजाळे,राहुल सतीश माने,शनि भारत बनसोडे,महादेव बाळासाहेब कोरके,विजय सदाशिव किरणगी,अनिल पंचलाल मेहता, सुमित नाना लवटे, प्रदीप पांडुरंग मानेचिक ,सर्व आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत श्रीराम पोरे, शिवकुमार मदभावी, राहुल रणवरे, अमोल बकाल, समीर पठाण, दत्तात्रय खरात, रणजीत जगताप, तुकाराम माने-देशमुख, विजय तवटे यांच्यासह सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पथकातील शरद कदम, स्वप्निल गायकवाड, सुरज हेंबाडे, अनिल शिंदे आणि प्रवीण मिटकरी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे आणि शस्त्रांशी संबंधित गुन्ह्यांवर कोणतीही गय केली जाणार नाही. अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात ही प्रभावी कारवाईची मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहील, असा इशारा सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

