विशेष प्रतिनिधी - महादेव मोहिते
टणु (इंदापूर): वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ह.भ.प. सचिन संभाजी मोहिते यांची इंदापूर तालुका अध्यक्षपदी, तर ह.भ.प. महेश महाराज सुतार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्यसनमुक्तीसाठी युवकांना नवी दिशा देण्याचे व सर्वसमावेशक मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे.
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांची सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक २७/१०/२०२५ रोजी टणु येथील ग्रामदैवत भर्तरीनाथ मंदिरात आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही महत्त्वाची निवड करण्यात आली. इंदापूर तालुक्यातील तरुणांना आणि ज्येष्ठांना मार्गदर्शन करून वारकरी संप्रदायाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावेत, तसेच वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कार्य करून संप्रदाय मजबूत करावा, यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
सदर सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज हांडे हे होते. जिल्हाध्यक्ष हांडे महाराज यांच्या हस्ते नवनियुक्त इंदापूर तालुका अध्यक्ष सचिन महाराज मोहिते यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आणि पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष माऊली महाराज कुंजीर, तानाजी महाराज खराडे, सविता ताई गवते, सुमनताई वाईकर, बाळासाहेब महाराज आटोळे, सुग्रीव महाराज मिटकल आदी पदाधिकारी व टणु पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


