महाराष्ट्र राज्यातील महा ई सेवा संघटना आणि आधार सेवा केंद्र धारकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान तीन दिवसांचे काम बंद आंदोलन पुकारले आहे. या काळात राज्यातील सर्व महा ई सेवा केंद्रे आणि आधार केंद्रे बंद राहणार आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या डिजिटल सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांना विविध डिजिटल ई-सेवा पुरवून महा ई सेवा आणि आधार सेवा केंद्र चालक नागरिकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचवत आहेत. संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या योगदानामुळे शासनाची वर्षाला ३ ते ४ हजार कोटी रुपयांची बचत होते. तसेच, या माध्यमातून लाखो तरुणांना रोजगार मिळून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.
मात्र, शासनाकडून सातत्याने सापत्न भावाची वागणूक मिळत असल्याचा आणि केंद्रांवर सतत टांगती तलवार ठेवल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.याविरोधात संघटनेने उच्च न्यायालय, मुंबई अंतर्गत नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. असे असूनही शासनाच्या भूमिकेत बदल होत नसल्यामुळे, शासनाविरुद्ध असहकाराची भूमिका घेत हे तीन दिवसीय काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाची आणि केंद्र बंद ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे. शासनाने त्यांच्या मागण्यांचा योग्य विचार करून तोडगा काढण्याची अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

