१ नोव्हेंबरच्या मुंबई मोर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणनीती ठरली?
करकंब: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मित्रपक्षांनी ग्रॅन्ड हॉटेल, करकंब येथे नुकतीच एक महत्त्वपूर्ण विचार विनिमय बैठक घेतली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका आणि १ नोव्हेंबर रोजी मुंबईतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रामुख्याने मुंबईतील १ नोव्हेंबरच्या मोर्चाच्या नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.तसेच,येणाऱ्या नगरपालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या संघटनात्मक तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मित्रपक्षांमध्ये समन्वय साधून एकत्रितपणे सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत निश्चित करण्यात आली.
या बैठकीला आमदार अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून संघटना मजबूत करण्यावर आणि आगामी काळात अधिक आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडण्यावर भर दिला. या बैठकीमुळे करकंब आणि परिसरात महाविकास आघाडीसह मनसेच्या एकजुटीने राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.


