या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांना खऱ्या अर्थाने 'नवसंजीवनी' मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादकता वाढवणे, मासेमारीच्या वेळी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि मच्छीमारांचे आर्थिक स्थैर्य वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. वितरित करण्यात आलेल्या या नौका अत्याधुनिक असून, त्या खोल समुद्रातील मासेमारीसाठी उपयुक्त आहेत, ज्यामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी वरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि ट्यूना मासेमारी सारख्या उच्च-मूल्याच्या मासेमारीला चालना मिळेल. मत्स्य व्यवसाय हा किनारपट्टी वरील लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रमुख आधार आहे. या योजनेंतर्गत मत्स्य व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या नौकांमध्ये जी पी एस, इको साऊंडर, व्ही एच एफ रेडिओ, ए आय एस, रडार यांसारख्या अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि संप्रेषण प्रणाली बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मासेमारी करताना मच्छीमारांची सुरक्षा वाढेल. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना, मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकी करणामुळे भारताची 'ब्लू इकॉनॉमी' बळकट होईल, असे मत व्यक्त केले.
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी मत्स्य व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी आणि राज्याच्या किनारपट्टी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.


