Breaking

शनिवार, १० जानेवारी, २०२६

हेल्मेट, सीटबेल्ट व सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी अकलूजमध्ये रस्ता सुरक्षा रॅली उत्साहात संपन्न


संग्रामनगर प्रतिनिधी - केदार लोहकरे 


अकलूज उप-प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि अकलूज पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ अंतर्गत हेल्मेट,सीटबेल्ट व सुरक्षित विद्यार्थी वाहतूक या विषयावर भव्य रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरात वाढत असलेल्या वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली. पोलीस उप-अधीक्षक संतोष वाळके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. रॅलीदरम्यान वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, येईल शाळा, वाट द्या बाळा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, वेग नियंत्रणात ठेवा, अशा घोषणा देत सहभागी मार्गक्रमण करीत होते.


या रॅलीमध्ये सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केले होते, तर चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्ट लावून सहभाग नोंदवला. तसेच सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचा संदेश देण्यासाठी विविध शाळांच्या स्कूल बसेसही रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यामुळे दुचाकीवर हेल्मेट वापरणे, चारचाकीमध्ये सीटबेल्ट लावणे आणि शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याचे महत्त्व नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले.

रॅलीमध्ये ड्रायव्हिंग स्कूल संचालक, चालक-मालक प्रतिनिधी संघाचे पदाधिकारी व सदस्य, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालय अकलूजच्या विद्यार्थीनी व प्राध्यापिका, अधिकृत दुचाकी विक्रेते सोनाज हिरो व नष्टे होंडा यांचे कर्मचारी, श्रीराम शिक्षण संस्था पाणीव, शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांच्या स्कूल बसेस सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक सातपुते, झाडबुके, पाटील, राऊत, मावळ, घुले, सावंत तसेच सर्व सहायक मोटार वाहन निरीक्षक, कर्मचारी व चालक उपस्थित होते. अकलूज पोलीस ठाण्याचे अधिकारी विक्रम साळुंखे, करिष्मा वनवे, संजय रेगुडे व इतर कर्मचारी यांनीही रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाचे संरक्षण करावे, हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. रस्ता सुरक्षा ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक वाहनचालक व नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.