माळीनगर (प्रतिनिधी): माळशिरस तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या माळीनगर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात यंदा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. आजवर प्रस्थापितांच्या दोन गटांत विभागलेली ही लढत आता 'वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी,RPIआणि मित्र पक्ष' यांच्या युतीमुळे अत्यंत चुरशीची झाली आहे. या तिसऱ्या नवशक्तीच्या एन्ट्रीमुळे प्रस्थापितांची झोप उडाली असून,काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.
माळीनगरच्या राजकारणात आजवर मोहिते-पाटील आणि गिरमे गट यांच्यातच प्रामुख्याने सत्तेची रस्सीखेच पाहायला मिळत होती. मात्र, वंचित,बसपा, RPI व मित्र पक्षाच्या युतीने मैदानात शड्डू ठोकल्याने पारंपारिक समीकरणे पूर्णपणे कोलमडली आहेत, त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माळीनगरचा मतदार हा नेहमीच निर्णायक भूमिकेत असतो. वंचित,बसपा, PPI व मित्र पक्ष यांच्या युतीमुळे या भागातील दलित व बहुजन समाज,अल्पसंख्याक मतदार,यांच्या मतांचे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जर ही मते नवशक्ती युतीच्या पारड्यात पडली,तर दिग्गज नेत्यांच्या विजयाचे गणित बिघडू शकते.यामुळेच मोहिते-पाटील आणि गिरमे या दोन्ही गटांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या भागावर मोहिते-पाटलांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, यंदा ही 'नवशक्ती' त्यांच्या गडाला सुरुंग लावण्यात यशस्वी ठरणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, गिरमे गट सत्तांतर घडवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच तिसऱ्या आघाडीने दिलेले आव्हान त्यांच्यासाठीही डोकेदुखी ठरत आहे.
वंचित,बसपा,PPI व मित्र पक्ष हा फॅक्टर केवळ माळीनगर गट व गणा पुरता मर्यादित राहिला नसून,त्याचे पडसाद संपूर्ण माळशिरस तालुक्यात उमटताना दिसत आहेत. या निवडणुकीचा निकाल केवळ स्थानिक सत्तेचा फैसला करणार नाही,तर माळीनगर सह माळशिरस तालुक्यात भविष्यातील राजकारणाची नवी दिशा ठरवणारा असेल,याचे उत्तर आता मतदारांच्या हातात आहे.

