सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल झाला असून, जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून एस. कार्तिकेयन यांनी शुक्रवारी दुपारी आपला पदभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरच्या जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली असून, त्यांनी कार्तिकेयन यांच्याकडे पदाची सूत्रे सुपूर्द केली. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवारी सायंकाळी या बदल्यांचे आदेश निर्गमित केले होते. नवे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन हे प्रशासकीय वर्तुळात अत्यंत अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.
आयएएस अधिकारी होण्यापूर्वी त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून व्यावसायिक कौशल्य मिळवले आहे. त्यांच्या या आर्थिक ज्ञानाचा सोलापूर जिल्ह्याच्या महसूल आणि विकास कामांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाला गती दिली.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये सीईओ म्हणून कार्यभार सांभाळला. कारकिर्दीच्या सुरुवातीला किनवट येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले.तसेच नागपूरला बदली झालेले कुमार आशीर्वाद यांचा सोलापूरमधील कार्यकाळ उल्लेखनीय ठरला. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने काम केले. बाधीत वाडी-वस्ती आणि समाजातील शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यांच्या या कार्यामुळे सोलापूरकरांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.


