Breaking

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

काळी दिवाळी' आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सरकारला इशारा; प्रति हेक्टर ₹५०,००० मदतीची मागणी



सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती व जनावरांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. घरे आणि शेतीमालाचीही मोठी हानी झाली आहे. मात्र राज्य सरकारने या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 'काळी दिवाळी आंदोलन' करून आपला तीव्र निषेध व्यक्त केला.सरकारने केलेल्या या दुर्लक्षाबद्दल आणि शेतकरी वर्गाची थट्टा केल्याबद्दल संताप व्यक्त करत पक्षाच्यावतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनाद्वारे पक्षाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून प्रति हेक्टर ₹५०,००० देण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्तांना तातडीने पुनर्वसन निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, सुधीर खरटमल यांच्यासह पक्षाचे इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारच्या शेतकरी धोरणांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केलेल्या या आंदोलनामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली असून, सरकारने तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी पक्षाच्या नेत्यांनी दिला.