श्रीपूर (माळशिरस):मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते आज श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याचबरोबर, कारखान्याच्या १०,००० मे. टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा आणि पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने हे दोन महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू करून सहकार क्षेत्रात एक नवे पाऊल टाकले आहे.
या महत्त्वाच्या सोहळ्याचे आयोजन कारखान्याचे मार्गदर्शक, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे जी, आमदार उत्तम जानकर, आ. अभिजीत पाटील, आ. नारायण पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, आमदार नारायण आबा पाटील, आमदार समाधान आवताडे, आ. बाबासाहेब देशमुख, आ. राजू खरे, माजी आमदार जयवंतराव जगताप, दीपक साळुंखे पाटील, शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे, राजेंद्र राऊत, दत्तात्रय सावंत यांसह अनेक मान्यवर नेतेमंडळी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्मयोगींच्या स्मृतींना उजाळा:
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात सुधाकरपंत परिचारक यांचे मोठे योगदान राहिले असून, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाने त्यांच्या स्मृती चिरकाल जागृत राहतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विकास प्रकल्पांची मुहूर्तमेढ :
पांडुरंग कारखान्याच्या गाळप क्षमतेचे विस्तारीकरण (सध्याची क्षमता ६,००० मे. टन प्रतिदिन ते प्रस्तावित १०,००० मे. टन प्रतिदिन) झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, वेळेत ऊस गाळप करणे शक्य होणार आहे. तसेच, पोटॅश निर्मिती प्रकल्पाद्वारे शेतीसाठी महत्त्वाचा घटक उपलब्ध होणार आहे. यामुळे कारखान्याच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन परिसराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रशांत परिचारक यांच्या दूरदृष्टीमुळे पांडुरंग कारखाना सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असून, या नव्या प्रकल्पांमुळे कारखान्याची प्रगती निश्चितच आणखी वाढेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.


