सोलापूर: सोलापूर आणि मुंबईकरांची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते सोलापूर-मुंबई विमानसेवेचे आज बुधवार, दि.१५ ऑक्टोबर रोजी झेंडा दाखवून उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सोलापूरच्या विकासाला गती देणारी ही विमानसेवा 'स्टार एअर लाईन' या कंपनीद्वारे चालवली जाणार आहे.या बहुप्रतिक्षित विमानसेवेच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री यांनी या सेवेचा प्रारंभ करताना, सोलापूर हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर थेट मुंबईशी जोडले गेल्याने या भागाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे मत व्यक्त केले.
यावेळी आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमा देशमुख, आ.सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, माजी खा. जयसिद्धेश्वर महाराज, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम. राजकुमार , सो.म.पा. आयुक्त डॉ. सचिन ओंबासे , प्रा. शिवाजीराव सावंत, तसेच स्टार एअर लाईनचे सर्व बोर्ड ऑफ डारेक्टर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' ला मंजुरी मिळाल्याने ही सेवा सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. सोलापूरहून मुंबई आणि बेंगळूरूसाठी नियमित विमानसेवा सुरू झाल्याने व्यापारी, विद्यार्थी आणि उद्योजक अशा सर्वांसाठी दळणवळण जलद आणि सुलभ होणार आहे. सोलापूरकरांच्या विकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असून,या विमानसेवेमुळे सोलापूरच्या पर्यटन, उद्योग आणि रोजगार निर्मितीला मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.



