मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मतदार यादीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आणि अनियमितता आढळून आल्याचा गंभीर आक्षेप या वेळी घेण्यात आला.
शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले की, मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि त्रुटी आहेत. यात लाखो खोटे मतदार यादीत समाविष्ट असून, अनेक ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या घरांच्या पत्त्यावर मतदार दाखवले गेले आहेत. याबाबत लवकरच ठोस पुरावे सादर करण्यात येणार असल्याचेही शिष्टमंडळाने यावेळी स्पष्ट केले.
निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात यासाठी शिष्टमंडळाने एक सक्षम सॉफ्टवेअर वापरून मतदार यादीतील दुबार नोंदणी झालेले आणि खोटे मतदार तातडीने वगळण्याची मागणी केली. तसेच, निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती करूनच निवडणुका घ्याव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली.
या महत्त्वपूर्ण शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, मनसे प्रमुख.राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ.जयंत पाटील ,खा.अनिल देसाई, आ.अनिल परब, शेकापचे आ.जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ.जितेंद्र आव्हाड, आ.रईस शेख, आ.आदित्य ठाकरे आणि कॉ. प्रकाश रेड्डी आदी मान्यवर नेत्यांचा समावेश होता.
सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रितपणे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मतदार यादीतील त्रुटी दूर करून, लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.


