बारामती/सोमेश्वर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. च्या सन २०२५-२६ च्या ६४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्यात अजितदादा पवार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मोलाचं मार्गदर्शन करत संबोधित केलं.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी बोलताना अजितदादा पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर, तसेच ऊस तोडणी आणि वाहतूक वेळेवर व सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्या बाबत मार्गदर्शन केलं.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने, साखर कारखान्यांनी पारदर्शक व कार्यक्षम कारभार करून शेतकऱ्यांचा विश्वास जपावा, हे त्यांनी अधोरेखित केलं. तसेच, हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढ यांसारख्या मोठ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ऊस शेतीत नवं तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन क्षमता वाढवण्याची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी अधिकारी, तसेच परिसरातील हजारो ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


