माळीनगर (प्रतिनिधी) माळीनगर येथील नारीशक्ती महिला मंडळाच्या वतीने आयोजित ‘शुभारंभ व होम मिनिस्टर’ स्पर्धा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रताप क्रीडा मंडळ, अकलूजच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, महिलांनी केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता आपल्या सुप्त कलागुणांना वाव देणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि समाजात एकतेची भावना दृढ होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मिनाक्षी जगदाळे( अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड पुणे विभाग), ॲड. हसीना शेख, सारीक एकतपुरे (कृषी अधिकारी),तनुजा पाटील, विद्या गिरमे, सीमा पांढरे तसेच ग्रामपंचायत सदस्य विशाखा निंबाळकर, असमा मुलाणी उपस्थित होत्या.‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे खुमासदार सूत्रसंचालन दिपाली गायकवाड - राऊत यांनी केले. विविध खेळ, उखाणे, नृत्य आणि मनोरंजक फेऱ्यांमधून महिलांनी उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.
यावेळी रंजना क्षीरसागर, तमन्ना इनामदार, युवा कीर्तनकार श्रावणी देशमाने , संगीत विशारद आकांक्षा देशमाने तसेच उपस्थित मान्यवरांचा व कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत दिपाली गवळी यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘पैठणी’चा मानाचा पुरस्कार मिळवला. द्वितीय क्रमांक रजनी गायकवाड (ठुशी), तृतीय क्रमांक प्रज्ञा किर्ते (नथ), चतुर्थ क्रमांक आरती चौगुले (डिनर सेट) आणि पाचवा क्रमांक पुनम लोखंडे (पर्स) यांनी मिळवला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या अध्यक्षा निवेदिता (राणीताई) बाळासाहेब कदम ,उपाध्यक्षा (ग्रामपंचायत सदस्य) विशाखा विराजसिंह निंबाळकर ,जयश्री पवार, रोहिणी खताळ, सूरर्या तांबोळी, तमन्ना इनामदार आणि दोन महिला होमगार्ड यांनी विशेष परिश्रम घेतले.




